Wednesday, 8 May 2013

गिर्यारॊहकांची पंढरी – हरिश्चंद्रगड!



      
 हरिश्चंद्रगड! निसर्गाचा एक अद्भूत अविष्कार आहे. निसर्गाने सजिव सृष्टीला बहाल केलेला एक अनमोल नजराणा आहे. रोजचं निरिशामय़ जीवन जगणाऱ्या आणि स्वतःशीच रडत बसणाऱ्या माणसाच्या चिमुकल्या हृदयामध्ये नवसंजिवनी निमार्ण करण्याचे सामर्थ्य हरिश्चंद्रगडामध्ये आहे. माणसाच्या मनामनामध्ये चैतनेय फुलविण्याचे सामर्थ्य हरिश्चंद्रगडामध्ये आहे.


हरिश्चंद्रगड...पहाड्यांच्याहीवर डोकारणारी उंचच उंच झाडे, वेली, पशू, पाखरे यांचं जणू काही घर आहे. आकाशालाही गवसणी घालणारे पवर्त, दऱ्या-खोऱ्या आणि काळीज पिळवटून टाकणारी वारा, वांदळ यांचं जणू काही गाव आहे आणि म्हणूनंच गिर्यारॊहकांची पंढरी हे हरिश्चंद्रगडाचे दुसरे नाव आहे.



     
      वार शनिवार पाच दिवस ऑफिसमध्ये काम केल्यानंतर शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत झोपणे हा जणू काही प्रत्येक संगणक अभियंत्याचा जन्मसिद्ध अधिकारंच... पण आजचा शनिवार त्याला अपवाद होता. आजचा शनिवार भल्या पहारे पाचलांच सुरु झाला होता. कारण आज एका मोहिमेची सुरुवात होणार होती. ट्रेक अनलिमिटेड हा आमचा सायबेज सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कायर्रत असलेला ग्रूप. अनेक उंच किल्ले, पवर्त, सह्याद्रीच्या रांगा अशा कितितरी ठिकाणी ट्रेकिंगचे आयोजन करून या ग्रूपने कंपनीतील प्रत्येकाच्याच मनात एक निमार्ण केले आहे. ह्याच ग्रूपने आयोजित केलेल्या एका नव्या मोहिमेसाठी आम्ही २२ जण सज्ज होत होतो.

      एक दिवस मुक्कामी जायचे असल्यामुळे बरोबर घ्यावयाच्या प्रत्येक गोष्टीची काळजीपुवर्क छाणनी चालली होती. टॉर्च, मेणबत्ती, माचिस, ट्रेकिंग सुट, पुरेसे पाणी, दोन दिवस टिकु शकेल असे अन्न अशा खूप काही गोष्टी आणि जोडीला तुडूंब भरलेला उत्साह...

      सकाळी ६ वाजता कंपनीमध्ये पोहोचले. तेव्हा गाडी आली होती आणि ४-५ अतिउत्साही कार्यकर्ते देखील निरंजन, प्रितेश, श्रेयश आणि वरुण, ट्रेक अनलिमिटेड ग्रूपचे केयूर यांची लगबग चालू होती. सगळ्या वस्तू बरोबर घेतल्यात ना? कोण कोण आहे... कुणाला काही समस्या तर नाही ना... याची कसून चौकशी ते करत होते. शेवटी एकदाची शिरगणती झाली आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली.

      मी मुळचा जुन्नरचा . त्यामुळे तेथील निसर्गसंपद्दा, रस्ते, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे यांची इत्यंभूत माहिती माझ्याकडे होती. वाटेत जाताना अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या विघ्नहराचे (ओझर) दशर्न घेऊन प्रत्येक जण “आमची मोहिम यशस्वी होवो” अशी जणू काही प्राथर्णाच करत होता. खिरेश्वर गावाकडे जाताना लागलेला खुबीचा बंधारा आणि त्याचा विशाल जलसागर जणू काही जुन्नरच्या नैसर्गिक श्रीमंतीची साक्ष देत होते. त्या पाण्यावर स्वच्छंदपणे विहार करणारे बगळे मनाला उल्हासित करत होते. खुबीच्या बंधाऱ्याच्या वाटेवरून जाताना सगळे झोपेतून जागे झाले. कारण रस्त्याची अवस्था खूपच विचित्र होती. खिरेश्वर गावातून तुडूंब भरून येणाऱ्या जीप “पिपली लाईव्ह” चे दृष्य डोळ्यासमोर उभ्या करत होत्या. अर्थातच आम्ही एका सुशिक्षित, विकसित, महासत्तेची स्वप्नं बघणाऱ्या एका प्रगत इंडियामधून एका अजूनही स्वातंत्र्यपुर्वे काळातील जीवन जगणाऱ्या भारतामध्ये आलो होतो.

      “आपण सहलीसाठी किंवा वर्षाविहारासाठी आलेलो नसून गिर्यारोहनासाठी आलेलो आहेत आणि म्हणूनंच लष्कराप्रमाणे शिस्त महत्वाची” हा केयूरने दिलेला कानमंत्र मनाशी घोळवत आम्ही चढाईला सुरुवात केली. निसर्गाचे एक अद्भूत रूप आम्हाला त्याठिकाणी पहायला मिळाले . अगदीच छोट्याश्या असणाऱ्या पायवाटा, एका बाजूला उंचच उंच पहाड तर दुसऱ्या बाजूला तितकीच खोल दरी. पावसाच्या पाण्यामुळे घसरणाऱ्या वायवाटा आणि भरदिवस घाबराबयाला लावणारी घनदार झाडी यामधून मार्ग काढत आम्ही चाललो होतो. एव्हाना “IT इफेक्ट” दिसायला लागला होता. आजू-बाजूला AC आणि बसायला आरामखुर्ची ह्यापैकी तेथे काहीच नव्हते. जवळ होत्या त्या फक्त कड्या-कपारितून, गवतातून अन् तीव्र उतारावरून जाणाऱ्या वाटा. प्रत्येक वळणावर पाय घसरून पडणाऱ्या शांताची (गिर-जा) गिरिजा कधी झाली आम्हाला कळलंच नाही आणि आम्ही सर्व तरुणांना लाजवत सगळ्यांच्याही पुढे धाव घेणारी केतकी जणू काही आमच्या बटालियनची कॅप्टनंच झाली होती.
        एव्हाना आम्ही गड काबीज केला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान होते . एक आनंद होता. एका लेण्यामध्ये आम्ही बरोबर आणलेल्या बॅग्ज ठेवून घाईघाईतच जेवण उरकले. कारण आम्हाला सूर्य अस्ताला जाण्यापुर्वी कोकणकडा गाठायचा होता. आम्ही कोकण कड्याला 
जाण्याची वाट धरली. दिवस मावळतीकडे झुकला होता. पुन्हा अर्धा तास पायपीट केल्यानंतर कोकणकड्याचे खरोखरंच अप्रतिम दृष्य काळजामध्ये धडकी भरतणारे होते. पुढे होवून डोकविण्याची सुद्धा हिम्मत कुणामध्ये होत नव्हती. आणि मग आपोआपच “राकट देशा, कणखर देशा, दगडांचा देशा” ह्या अजरामर कवितेच्या ओळी ओठावर घुमु लागल्या.

      रात्री आमच्या राहण्यासाठी  ५ स्टार व्यवस्था हरिश्चंद्रेश्वरच्या मंदिराजवळील लेण्यामध्ये केली होती. किर्र अंधार, गुहेबाहेर पेटविलेली शेकोटी, अधूनमधून दर्शन देणारा पौर्णिमेचा चंद्र आजूबाजूच्या लेण्यांमधील १००-१५० पर्यटक आणि अंधार-उनेडाच्या खेळामध्ये अधुन-मधून दृष्टूस पडणारे हरिश्चंद्रवराचे मंदिर...बस्स... गडाखालील खिरेश्वर गावातील तुकाराम आणि त्यांचे सहकारी शनिवारी आणि रविवारी गडावर जेवंण बनविण्यासाठी व्यवसाय करतात. स्वयंपाकाला वेळ होता. अन् मग तोपर्यंत शेकोटी भोवती अंताक्षरीने जोर पकडला. तोंडाला पाणी आणणारं पिठलं, बाजरीची भाकंर, सडीच्या तांडळाचा भात, पंच्चपक्वनालाही लाजविणाऱ्या त्या मेजवानीची चव आजही जीभेवर रेंगाळत राहते. जेवणानंतर शेकोटीभोवती बसून रात्री १२ वाजेपर्यंत चाललेल्या अंताक्षरीचे सुर आजही कानावर येतात. नंतर रात्र शांत झाली होती. सगळे आपआपल्या लेण्यांमध्ये स्थिरावले होते.

      दुसऱ्यादिवशी आम्ही सकाळी ६ वाजताच सुरुवात केली. सह्याद्री पर्वतरांगावरील कळसुबाईनंतरचे सर्वात उंच शिखर म्हणजेच तारामती पीक, घनदार जंगलातून जाणारी खडतर वाट, अंगावर येणारे आणि क्षणात दिसेनासे करणारे दाट धुके आणि सोसाट्याचा वारा ह्या सर्वाना छेदत आम्ही तारामती पीक सर केले सुद्धा! सर्वात उंचीवरील शंकराची आकर्षक पिंड खुपच मनमोहक होती.

      गडावरील हरिश्चंद्रवराचे मंदिर जणू काही प्राचीन कलाकृतीचा आकर्षक नमूना आहे. संत चांगदेवानी “तत्वसार हा ग्रंथही ह्याच मंदिरामध्ये लिहिला. पुढच्या पिढिलाही ह्या सुंदर, कलाकृतीचा अनुभव द्यावयाचा असेल तर पुरातत्व विभागाने ह्या मंदिराची डागडूजी करणे गरजेचे आहे.

      दोन दिवसांची मोहिम फत्ते  करून खिरेश्वरला पुन्हा आल्यानंतर आम्ही परतीची वाट धरली एका सुंदर, संपन्न भारतातून एका MODERN इंडियाकडे...

No comments:

Post a Comment