गणेशोत्सवातून जनजागृती
आजूबाजूला अस्वस्थ करणारया घटना. रोजंच अत्याचाराला बळी पडणारया स्त्रिया, अगदी ७ वर्षाच्या बालीकेपासून ते ७० वर्षाच्या आजीबाईपर्यंत घडून येणारे बलात्कार. भर रस्त्यात निघालेले अब्रूचे धिंडवडे आणि अगदी सहजतेनेच हे सर्व पाहून पाहून तितक्याच सहजतेने काहीच घडले नाही ह्या थाटात पुढे निघून जाणारा समाज. हे झाले मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्यावर होणारे अत्याचार. पण मुलगी जन्माला यायच्या आगोदर देखील आपण तिच्यावर अत्याचारच करतो ना? होय, स्त्री भृणहत्या!
सनराइज प्रतिष्ठान हि निमगाव तर्फे महाळुंगे, जुन्नर ह्या ठिकाणी गावच्या विकासासाठी स्थापन केलेली संस्था. गावामध्ये पाणी, वृक्षारोपण, शैक्षणिक पशुपालन क्षेत्रामध्ये केलेली भरीव कामगिरी पाहून पुढे पुण्यामध्ये विविध कंपनीज मध्ये विशेषता IT मध्ये काम करणारे अनेक जन ह्या प्रतिष्ठानला जोडले गेले. गणपती बाप्पाच्या ह्या १० दिवसाच्या उत्सवामध्ये सगळ्यांचीच खूप दमछाक झाली. संध्याकाळी कार्यक्रमाला वेळेवर निघायचं म्हणून काम पूर्ण करायची धडपड, दुपारचं घाईगडबडीत केलेलं जेवण, ऑफिस सुटल्यानंतर पुण्याच्या गर्दीने खच्च भरलेल्या रस्त्यांवरून कार्यक्रमाला पोहोचायची लगबग आणि पुन्हा कार्यक्रम संपल्यानंतर घरी कसंबसं पोहोचायचं आणि मिळालंच जेवण कुठे तर जेवायचं…।
एका बाजूला स्त्री भृणहत्या, अत्याचार आणि दुसऱ्या बाजूला मागील उन्हाळ्यात महाराष्ट्रानेच नव्हे तर सबंध देशाने अनुभवलेला (अनुभवलेला कसला, भोगलेला) दुष्काळ. तडफडून मेलेली शेकडो जनावरे. उध्वस्त झालेले हजारो संसार. देशोधडीला लागलेला शेतकरी. एवढी सगळी लागलेली अस्वस्थतेची आग पहिल्या पावसातच विझून गेली आणि पुन्हा पाण्याचा बेसुमार आणि बेजबाबदार वापर सुरूच झाला. पाणी बचतीचे आणि जिरविण्याचे सर्व धडे पहिल्या पावसातच विरघळून गेले.
मन सुन्न होवून जायचं. कितीदिवस असंतोष दडपून ठेवायचा? समाजाला जागे करण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली. आणि मंग ह्याच गणेश उत्सवात "लेक वाचवा" आणि "पाणी वाचवा" ह्या दोन विषयांवर जनजागृती करण्याचा निर्णय आम्ही घेतला. साधारणता २० जणांचा ग्रुप, "सनराइज प्रतिष्ठान" ह्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कामाला लागला.
गणपती सुरु होण्याच्या १ महिना अगोदर संभाजी पार्क मध्ये होणाऱ्या मासिक मिटींग मध्ये आम्ही सर्वांना कल्पना दिली. पुढचा एक महिना शनिवार आणि रविवार एकत्र भेटायचं. कुणीही कसलाही प्लान करायचा नाही. घरी जाणे बंद, trekking बंद. चित्रपट बंद. दिवसभर practice करायची. पिंपळे सौदागरला सचिन चा २ bhk आहे. त्यामुळे practice साठी जागेची अडचण दूर झाली. practice च्या एका महिन्यात नीरज, अनुज आणि ज्ञानेश्वर ह्यांचे वाढदिवस आम्ही सचिन च्या घरीच साजरे केले. दुपारचं जेवण एकत्र करताना विशेष मजा यायची.
"लेक वाचवा" हे नाटक मराठी मध्ये आणि "पाणी वाचवा" हे नाटक हिंदी मध्ये करण्याचे ठरले. आमच्या ग्रुप मध्ये हिंदी आणि मराठी, दोन्हीही भाषिक असल्याने "पाणी वाचवा" हा विषय हिंदी मध्ये मांडायचा ठरले. विशेषता सोसायटीज मध्ये जिथे पाण्याचा सर्रास गैरवापर होतो आणि तेथील सर्व लोकांना हिंदी भाषा समजू शकते अशा ठिकाणी आम्ही "पाणी वाचवा" हा विषय मांडला.
एक आठवडा बाकी असताना आम्ही विविध गणपती मंडळांना भेटी दिल्या आणि गणपतीच्या ९ दिवसाचा कार्यक्रम पक्का केला. कुठलेही शुल्क नाही, फक्त २ माईक एवढीच आमची अपेक्षा. सर्व मित्रांना सूचना दिल्या गेल्या. ऑफिस मधून वेळेवर निघायचे आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचे.
गणपतीच्या 9 दिवसामध्ये आम्ही पुणे, खेड आणि जुन्नर ह्या भागामध्ये "लेक वाचवा" ह्या विषयावर ९ आणि पाणी वाचवा ह्या विषयावर ५ नाटकं सादर केली. सगळीकडेच अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. बऱ्याच वेळा पाउस पडत असताना देखील नाटक पाहायला झालेली प्रचंड गर्दी , पाणी हा विषय ऐकताना प्रेक्षकांचे झालेले धीरगंभीर चेहरे आणि स्त्री भृणहत्या विषय मांडताना पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा आमच्या साठी खूप मोठं बक्षिश होतं.





No comments:
Post a Comment