Thursday, 17 October 2013

आई - बाप

पोरांसाठी खूप काही करणारे, आई बाप मिळतील कैक
कुठे कमी पडलो असू आम्हीही, पण आमचं म्हणणं तर ऐक… 

अजूनही आठवतात आम्हाला, उपाशीपोटी झोपलेल्या राती
"उगाचच त्रास नको ह्यांचा", असं म्हणत दुरावलेली नाती

हाती काही यायचंच नाही, जिरायत जमीन कसताना
पण खूप आनंद व्हायचा, तुला शाळेत गेलेला पाहताना

नाही शरम वाटली फाटक्या कपड्यांचीतुला नवी सायकल घेताना
नाही लाज बाळगली तुटक्या चपलेची, तुझे लाड-हट्ट पुरवताना

नाही वाटले तुझ्या आईला, कधी घ्यावी हौसेने एखादी साडी
कुठेच थांबू द्यायची नव्हती आम्हाला, तुझ्या शिक्षणाची गाडी… 

नाही बांधून ठेवू शकलो तुझ्यासाठी बंगला, जमवू शकलो धनदौलत सारी
पण लक्षात ठेव बाळा, नाही कमी पडून दिली तुला संस्काराची शिदोरी

विसरून गेलो दुखणं-खुपणं, तुला पायावर उभं करताना
आजार आपोआप बरे झाले, तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहताना
     
आमच्या आई-बापाकडून काय मिळालं, ह्याचा विचार आम्ही कधीच नाही केला
त्यांच्याकडून मिळालेल्या आत्मविश्वास आणि जिद्दीने, संसार मात्र पुढे नेला

तुला आम्ही रागावलो, प्रसंगी मारलं सुद्धा
तुला सुधराविन्याचाच हेतू, त्यात होता बहुदा

आता जेवढे कंटाळवाणे, निरस वाटतो, तसे आम्ही पहिले नव्हतोच मुळी
ज्या भयाण परिस्थितून गेलो आम्ही, त्यामुळेच आली आमच्यावर हि पाळी

मेहनतीवर ठेवला विश्वास, नाही झालो कधी कुणापुढे लाचार
अभिमानाने सांगू शकशील जगाला, माझे आई बाप आहेत इमानदार…!

                                                          -- अतुल पारखे

No comments:

Post a Comment