Wednesday 13 May 2015

कवितेचा मळा फुलवतो आहे..

चिंब भिजलेल्या हृदयात माझ्या,
शब्दांची पेरणी करतो आहे,
तुझ्या प्रेमाच्या सिंचनाने,
कवितेचा मळा फुलवतो आहे!

 जाई-जुईला बहर आलाय,
रातराणी गालात हसतेय…
प्रेमाचा गुलाब तर केव्हाच बहरलाय
सोनचाफा वाऱ्यावर डोलतो आहे….
तुझ्या प्रेमाच्या सिंचनाने,
कवितेचा मळा फुलवतो आहे!

हृदयात छोटासा मळा आकारत आहे
पहाटेच्या वेळी पडलेले स्वप्नं साकारत आहे
तांबडं तर केव्हाच फुटलंय,
मनाच्या क्षितिजावर सूर्य उगवतो आहे
तुझ्या प्रेमाच्या सिंचनाने,
कवितेचा मळा फुलवतो आहे!

Thursday 7 May 2015

सलमान खान यास पत्र....

सलमान खान यास,
काल न्यायालयाने तुझ्यावरील सर्व आरोप सिद्ध करत तुला दोषी ठरवलं आणि सजा देखील सुनावली. अभिनय क्षेत्रात दबंगगिरी करणारा कलाकार प्रत्यक्ष जीवनात रडताना पाहून वाईट वाटले. अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये तू खूप चांगली कामं करतो आहेस असं मी ऐकलं. तसाच तू मनाने खूप चांगला आहेस, सिनेसृष्टीत कित्येकांना तू स्वत्ताच्या पायावर उभं केलेलं देखील मी ऐकलं. पण त्याबरोबरच, बऱ्याच वेळा दारू पावून धिंगाणा, स्वत्ताच्याच सुरक्षा रक्षकास मारहाण, निष्पाप काळविटाची शिकार यांसारखे अनेक प्रकार देखील आम्ही अनेकवेळा पाहिले. तेव्हा तुझ्याशी थोडं बोलावं म्हणून हा पत्र प्रपंच.

तू एक चांगला माणूस आहेसच, यात शंकाच नाही. पण स्वत्ताला वाचविण्यासाठी तू इतकं खोटं बोलशील असं आजीबात वाटलं नाही. त्यामुळे मला तर तुझ्या चांगुलपणावरच शंका येते. गाडी मी चालवत नव्हतो तर माझा चालक चालवत होता, म्हणजे स्वत्ताची मस्तवाल चमडी वाचविण्यासाठी तू त्या निष्पाप अशोक सिंगची, ज्याने तुझी २० वर्षापेक्षा जास्त काळ सेवा केली, त्याचीही तू  कुर्बानी द्यायला निघाला होतास?

आणि अशोक सिंगने देखील सर्व आरोप स्वत्तावर घेतले ह्याला मालकाप्रती असलेली इमानदारी समजून त्याचं कौतुक करावं कि सन्माननीय न्यायाधीश साहेबाच्या समोर असलेला हातोडा घेवून त्याचं डोकं फोडावं हेच आम्हा सामान्य माणसाला कळत नाही.

तू तुझ्या मित्रांबरोबर अपघाताच्या आधी जुहूच्या हॉटेल मधून मद्य न घेता फक्त पाणी पिवून बाहेर पडलास. खरंच, हे ऐकून तुझ्या चांगल्या वर्तनाबद्दल खात्रीच पटली.

तुझ्या खोटारडेपणाचा सगळ्यात मोठा बळी ठरला तो म्हणजे रविंद्र पाटील. तो तर तुझा अंगरक्षक होता. पण त्याआधी देशसेवेला वाहून घेतलेला इमानदार पोलिस होता. स्वत्ताच्या खरेपणाची एवढी मोठी शिक्षा कदाचितच दुसऱ्या कुणाला मिळाली असेल. त्याने तुझ्याविरोधात साक्ष दिल्यावर पुढे त्याच्या कुटुंबाने साथ सोडली. सहकाऱ्यांनी दूर लोटलं. त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. प्रचंड तणावामध्ये गेला. पण त्याने शेवट पर्यंत साक्ष नाही फिरवली. तू तुझ्या समाजसेवेचा भाग म्हणून त्याला काही पैसेही देण्याचा प्रयत्न केला असशिलच पण तो विकला गेला नाही. बिचारा तणावाने आणि TB  ने खंगून खंगून मेला.

सल्लू भाई, तू करत असलेल्या समाजसेवेचा आणि तुला झालेल्या शिक्षेचा काय संबंध…???

समाजसेवा करणं म्हणजे काही गुन्हेगारी करण्यासाठी permit नव्हे.  तसं जर असतं तर अण्णा हजारे, बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ यांसारखी माणसं हजारो गुन्हे करू शकतील इतकं मोठं त्यांचा सामाजिक कार्य आहे.

भाग्यवान आहेस सलमान भाई तू! खूप चांगले मित्रं मिळाले तुला. तुला शिक्षा झाल्यावर अगदी सगळ्यांनी एका सुरात गळा काढायला सुरुवात केली आणि ह्याच्यात सर्वात पहिला नंबर मिळविला आभिजीत भट्टाचार्यने.  पण त्या अभिजित भट्टाचार्याला हे देखील कळायला नको कि, फुटपाथ हि जशी झोपण्यासाठी नसते, तशी ती गाडी चालवण्यासाठी सुद्धा नसते. स्वत्ताच्या आवाजाप्रमाणेच कधीतरी डोक्याचा पण चांगला वापर कर ना म्हणावं त्याला ! तुझ्याबद्दल ह्यांना सहानुभूती वाटते ह्याचं आम्हाला दुखं नाही पण बळी गेलेल्या सामान्य माणसांबद्दल कधी ह्यांनी चकार शब्द काढला आहे का आजपर्यंत?

गेली २ दिवस राजकारणी आणि सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळी तुझ्या घरी येवून तुला सहानुभूती दाखवत आहेत. चांगली गोष्ट आहे. पण यातील एकाला देखील १ दिवस रवींद्र पाटील च्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करावसं वाटलं नाही, ह्याचं दुखं वाटतं.

आता तुझ्यासारख्या मोठ्या माणसाने शिक्षेला घाबरायची काहीच गरज नाहीये. दर १०-१५ दिवसांनी नक्कीच तुला तुरुंगातून रजा मिळेल. हवं असल्यास संजूभाईची मदत घे. ह्याकामी त्याचा अनुभव दांडगा आहे. आणि घाबरू नकोस मित्रा. तुला तुरुंगात गेल्यावर काही कामे करावी लागणार नाही. कारण कारावास हा सामान्य माणसांसाठी असतो. तुमच्यासाठी आत काय आणि बाहेर काय? मज्जाच मज्जा.

तुझं तुरुंगात गेल्यामुळे जरी आर्थिक नुकसान होणार असलं तरी प्रसिद्धीच्या बाबतीत आजीबात घाबरू नको. ज्यावेळेस तू मुंबईच्या घरापासून येरवडा तुरुंगात यायला निघशील त्यावेळेस पूर्ण रस्त्याने तुझी न्यूज कव्हर केली जाईल आणि लाइव्ह दाखीविली जाईल. आणि मग आमच्या घरातील माता भगिनीच कशाला तर तरुण देखील तुला तुरुंगात जाताना पाहताना धाय मोकलून रडू लागतील!

अजून काय लिहू. आता मला देखील रडू आवरत नाही.

                             कळावे, काळजी घे!
                                     अतुल पारखे.

Monday 10 February 2014

गणेशोत्सवातून जनजागृती

गणेशोत्सवातून जनजागृती 

आजूबाजूला अस्वस्थ करणारया घटना. रोजंच अत्याचाराला बळी पडणारया स्त्रिया, अगदी वर्षाच्या बालीकेपासून ते ७० वर्षाच्या आजीबाईपर्यंत घडून येणारे बलात्कार. भर रस्त्यात निघालेले अब्रूचे धिंडवडे आणि अगदी सहजतेनेच हे सर्व पाहून पाहून तितक्याच सहजतेने काहीच घडले नाही ह्या थाटात पुढे निघून जाणारा समाज. हे झाले मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्यावर होणारे अत्याचार. पण मुलगी जन्माला यायच्या आगोदर देखील आपण तिच्यावर अत्याचारच करतो ना? होय, स्त्री भृणहत्या!  
सनराइज प्रतिष्ठान हि निमगाव तर्फे महाळुंगे, जुन्नर ह्या ठिकाणी गावच्या विकासासाठी स्थापन केलेली संस्था. गावामध्ये पाणी, वृक्षारोपण, शैक्षणिक पशुपालन क्षेत्रामध्ये केलेली भरीव कामगिरी पाहून पुढे पुण्यामध्ये विविध कंपनीज मध्ये विशेषता IT मध्ये काम करणारे अनेक जन ह्या प्रतिष्ठानला जोडले गेलेगणपती बाप्पाच्या ह्या १०  दिवसाच्या उत्सवामध्ये सगळ्यांचीच खूप दमछाक झाली. संध्याकाळी कार्यक्रमाला वेळेवर निघायचं म्हणून काम पूर्ण करायची धडपड, दुपारचं घाईगडबडीत  केलेलं जेवण, ऑफिस सुटल्यानंतर पुण्याच्या गर्दीने खच्च भरलेल्या रस्त्यांवरून कार्यक्रमाला पोहोचायची लगबग  आणि पुन्हा कार्यक्रम संपल्यानंतर घरी कसंबसं पोहोचायचं आणि मिळालंच जेवण कुठे तर जेवायचं 


एका बाजूला स्त्री भृणहत्या, अत्याचार आणि दुसऱ्या बाजूला मागील  उन्हाळ्यात महाराष्ट्रानेच नव्हे तर सबंध देशाने अनुभवलेला (अनुभवलेला कसला, भोगलेला) दुष्काळ. तडफडून मेलेली शेकडो जनावरे. उध्वस्त झालेले हजारो संसार. देशोधडीला लागलेला शेतकरी. एवढी सगळी लागलेली अस्वस्थतेची आग पहिल्या पावसातच विझून गेली आणि पुन्हा पाण्याचा बेसुमार आणि बेजबाबदार वापर सुरूच झाला. पाणी बचतीचे आणि जिरविण्याचे  सर्व धडे पहिल्या पावसातच विरघळून गेले.  

मन सुन्न होवून जायचं. कितीदिवस असंतोष दडपून ठेवायचा? समाजाला जागे करण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली. आणि मंग ह्याच गणेश उत्सवात "लेक वाचवा" आणि "पाणी वाचवा" ह्या दोन विषयांवर जनजागृती करण्याचा निर्णय आम्ही घेतला. साधारणता  २० जणांचा ग्रुप, "सनराइज प्रतिष्ठानह्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कामाला लागला.  
गणपती सुरु होण्याच्या   महिना  अगोदर संभाजी पार्क मध्ये होणाऱ्या मासिक मिटींग मध्ये आम्ही सर्वांना कल्पना दिली. पुढचा एक महिना शनिवार आणि रविवार एकत्र भेटायचं. कुणीही कसलाही प्लान करायचा नाही. घरी जाणे बंद, trekking  बंद. चित्रपट बंद. दिवसभर practice करायची. पिंपळे सौदागरला सचिन चा bhk आहे. त्यामुळे practice साठी जागेची अडचण दूर झाली. practice च्या एका महिन्यात नीरज, अनुज आणि ज्ञानेश्वर ह्यांचे वाढदिवस आम्ही सचिन च्या घरीच साजरे केले. दुपारचं जेवण एकत्र करताना विशेष मजा यायची
"लेक वाचवा" हे नाटक मराठी मध्ये आणि "पाणी वाचवा" हे नाटक हिंदी मध्ये करण्याचे ठरले. आमच्या ग्रुप मध्ये हिंदी आणि मराठी, दोन्हीही भाषिक असल्याने "पाणी वाचवा" हा विषय हिंदी मध्ये मांडायचा ठरले. विशेषता सोसायटीज  मध्ये जिथे पाण्याचा सर्रास गैरवापर होतो आणि तेथील सर्व लोकांना हिंदी भाषा समजू शकते अशा ठिकाणी आम्ही "पाणी वाचवा" हा विषय मांडला

एक आठवडा बाकी असताना आम्ही विविध गणपती मंडळांना भेटी दिल्या आणि गणपतीच्या दिवसाचा कार्यक्रम पक्का केला. कुठलेही शुल्क नाही, फक्त माईक एवढीच आमची अपेक्षा. सर्व मित्रांना सूचना दिल्या गेल्या. ऑफिस मधून वेळेवर निघायचे आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचे.  

गणपतीच्या 9 दिवसामध्ये आम्ही पुणे, खेड आणि जुन्नर ह्या भागामध्ये "लेक वाचवा" ह्या विषयावर आणि पाणी वाचवा ह्या विषयावर नाटकं सादर केली. सगळीकडेच अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. बऱ्याच वेळा पाउस पडत असताना देखील नाटक पाहायला झालेली प्रचंड गर्दी , पाणी हा विषय ऐकताना प्रेक्षकांचे झालेले  धीरगंभीर चेहरे आणि स्त्री भृणहत्या विषय मांडताना पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा आमच्या साठी खूप मोठं बक्षिश होतं.

Tuesday 10 December 2013

कमळ फुललं… चर्चा तर होणारंच !

२०१४ लोकसभेच्या पूर्वसंध्येला चार राज्यांमध्ये भाजपची झालेली सरशी हि खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदीच म्हणावी लागेल. विकास, सुशासन, स्थानिक नेते, तेथील मुख्यमंत्री ह्यांच्या कामगिरीबरोबरच नरेंद्र मोदींच्या कर्तुत्व आणि वक्तृत्वाचा हा विजय म्हणावा लागेल. विधानसभेचे निकाल जाहीर झाले आणि बघता बघता शेअर बाजाराने पाच वर्षातील उच्चांक गाठला. हा मोदी आणि भाजपवरचा जनतेचा विश्वास आहे.
लोकसभेच्या निवडणुकीला ४ महिन्यांचा अवधी बाकी आहे. तोपर्यंत भाजपाने सबुरीने घ्यायला हवे आणि हीच उमेद कायम ठेवायला हवी. जर असे झाले तर दिल्ली जिंकण जास्त अवघड असणार नाही.   

राहुल गांधीसारख्या कमकुवत, दिशाहीन आणि दिखाऊ नेतृत्वाला तरुण आणि जनता कधीच भुलणार नाही हे देखील आता सिद्ध झाले आहे. कॉंग्रेसचा विजय झाला असता तर त्याचे सारे श्रेय राहुल गांधींना दिले गेले असते आणि आता पराजय झाला आहे तर त्याची जबाबदारी स्वत्तावर घ्यायला त्यांचे इतर नेते अपेक्षेप्रमाणे पुढे येत आहेत.

कुणाला पाठींबा द्यायचा नाही आणि कुणाचा पाठींबा घ्यायचा नाही, अशी भूमिका AAP च्या राजकीय धुरिणांनी घेतलेली आहे. म्हणजे जन्माला येणारे सरकार हे अस्थिर सरकार असणार. ते कोणत्याही क्षणी कोसळणार. मंग पुन्हा निवडणुका.
एवढेच काय पण कोणीही सरकार स्थापन करु शकले नाही तर लगेच निवडणुकांना समोरे जायची तयारी देखील त्यांनी सुरु केली आहे. एकीकडे जनता महागाईने होरपळत असताना, निवडणूक कमीतकमी खर्चात लढवली जावी हि आप ची भूमिका असताना, पुन्हा लगेच जनतेवर निवडणुका लादणं किती शहाणपनाचं आहे? स्वत्ताची शक्ती पुन्हा एकदा आजमावण्यासाठी जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य आहे? आणि जरी पुन्हा निवडणुका होऊनही त्रिशंकू अवस्था निर्माण झाली तर मंग पुन्हा निवडणुका घ्यायच्या का? याचेही उत्तर आप ला द्यावे लागेल. स्वत्ताच्या जाहीर नाम्यामधला महागाईचा मुद्दा आप वाले स्वत्ताच विसरले आहेत कि काय अशी शंका देखील मनामध्ये येते .
आघाडीच सरकार स्थापन करूनही विकास करता येतो हे अटलजींनी अगोदरच सिद्ध केलेले आहे. किमान समान कार्यक्रम घेऊन पुढे जायला काय हरकत आहे?

आप च्या जाहीरनाम्यात एक गोष्ट वाचनात आली, "सत्तेत आल्यास २९  डिसेंबर पर्यंत जनलोकपाल आणणार".  वास्तविक पाहता जनलोकपाल हे विधेयक संसदेतच मंजूर  होऊ शकते. तो अधिकार राज्यांना नाही. फार फार तर चांगला लोकायुक्त ते नियुक्त करू शकतात. मंग जनलोकपाल आणण्याचे वचन ते जनतेला कोणत्या आधारावर देत आहेत?
ज्या पक्षाचा अजून पहिला जन्मदिवस हि झाला नाही त्या AAP ने निच्छितच दिल्ली मध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. पदार्पणातच भरघोस यश मिळविले आहे. पण म्हणून लगेच केजरीवाल यांच्याकडे नवीन राजकीय पर्याय म्हणून पाहणे घाईचे आणि अशहाणपणाचे ठरेल. आम्ही एकटेच स्वछ आणि बाकी सगळ्यान्ना एकाच तराजूत तोलण्याची AAP च्या नेत्यांची खोड पाहता, आगामी काळामध्ये AAP च्या समर्थकांचा खूप मोठा भ्रमनिरास होऊ शकतो.

केजरीवाल आणि आण्णांनी पुकारलेल्या जंतरमंतर वरील आंदोलनाला जनतेचा भरघोस पाठींबा मिळाला. देशबांधवांनी त्या आंदोलनाला अगदी डोक्यावर घेतले. पण झालं काय? जनलोकपाल तर मंजूर झालं  नाहीच, पण ह्या नेत्यामध्ये एकी राहिली नाही, संघटनेची फाटाफूट झाली. नाही तसे आरोप एकमेकांवर झाले. भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन उभारलेल्या नेत्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
तसं ह्या आंदोलनातून काही चांगल्या गोष्टी घडल्या देखील. सरकारवर दबाव वाढला, लोक जागृत झाले. पण ज्या गोष्टीसाठी आंदोलन उभारलं गेलं ती साध्य व्हायच्या आतंच चळवळ भंग पावली. दिल्ली निवडणुकी दरम्यान आण्णांनी गंभीर आरोप केजरीवाल यांच्यावर केलेत. ते दुर्लक्षित करून चालणार नाही.

आणि ज्यावेळेस ह्या नेत्यामाध्ये एकवाक्यता राहिली नाही, आरोप प्रत्यारोप झाले, त्यावेळेस जनता देखील सावध झाली आणि ह्या आंदोलनापासून दुरावली गेली. त्याचा प्रत्यय आपल्याला मुंबई आंदोलनाच्या वेळी आलाच आहे. अगदी AC बस वाहतुकीसाठी उपलब्ध केल्या गेल्या, राजस्थान वरून आचारी बोलवून राजेशाही थाटात जेवणावळी उठवल्या गेल्या, तरीसुद्धा लोक त्याठिकाणी फिरकले नाहीत. - महिन्यातच लोकांच्या मानसिकतेत बदल झाला. कारण भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलनाची थट्टा केली गेली होती.
आणि म्हणूनच AAP च्या नेत्यांचा असाच हेकेखोरपणा चालू राहिला तर एक ना एक दिवस दिल्लीचा "जनादेश" हा "जनक्षोभा" मध्ये बदलायला वेळ लागणार नाही

राहता राहिला प्रश्न पवार साहेबांचा. ज्यापक्षाचे महाराष्ट्रामध्ये दोन अंकी सुधा खासदार नाहीत त्यांनी कॉंग्रेस च्या केंद्रींय नेतृत्वाला कानपिचक्या द्यायची गरज नाही. पवार साहेबांनी ""लोकांना कणखर, निर्णायक आणि परिणामकारक नेत्यांची गरज आहे," असा काहीसा ब्लॉग लिहिला आहे.

आपण महाराष्ट्रामध्ये किती कणखरपणे आणि परिणामकारकपणे जनतेचे प्रश्न सोडवत आहात हाच मुळी संशोधनाचा विषय आहे. आपलेच सरकार असताना आपलेच चार आमदार आणि चाळीस नगरसेवक अनधिकृत बांधकाम प्रश्नी राजीनामा देतात, किती मोठा विनोद आहे हा? बॉम्बस्फोट, भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या यांच्या "मालिका" कशा थांबवायच्या याही पेक्षा आपल्याला क्रिकेटच्या "मालिका" कशा भरवायच्या हे महत्वाचं वाटतं हीच दुर्दैवाची गोष्ट आहे.

                                                                                              --- अतुल पारखे 

Thursday 17 October 2013

परी...


आई - बाप

पोरांसाठी खूप काही करणारे, आई बाप मिळतील कैक
कुठे कमी पडलो असू आम्हीही, पण आमचं म्हणणं तर ऐक… 

अजूनही आठवतात आम्हाला, उपाशीपोटी झोपलेल्या राती
"उगाचच त्रास नको ह्यांचा", असं म्हणत दुरावलेली नाती

हाती काही यायचंच नाही, जिरायत जमीन कसताना
पण खूप आनंद व्हायचा, तुला शाळेत गेलेला पाहताना

नाही शरम वाटली फाटक्या कपड्यांचीतुला नवी सायकल घेताना
नाही लाज बाळगली तुटक्या चपलेची, तुझे लाड-हट्ट पुरवताना

नाही वाटले तुझ्या आईला, कधी घ्यावी हौसेने एखादी साडी
कुठेच थांबू द्यायची नव्हती आम्हाला, तुझ्या शिक्षणाची गाडी… 

नाही बांधून ठेवू शकलो तुझ्यासाठी बंगला, जमवू शकलो धनदौलत सारी
पण लक्षात ठेव बाळा, नाही कमी पडून दिली तुला संस्काराची शिदोरी

विसरून गेलो दुखणं-खुपणं, तुला पायावर उभं करताना
आजार आपोआप बरे झाले, तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहताना
     
आमच्या आई-बापाकडून काय मिळालं, ह्याचा विचार आम्ही कधीच नाही केला
त्यांच्याकडून मिळालेल्या आत्मविश्वास आणि जिद्दीने, संसार मात्र पुढे नेला

तुला आम्ही रागावलो, प्रसंगी मारलं सुद्धा
तुला सुधराविन्याचाच हेतू, त्यात होता बहुदा

आता जेवढे कंटाळवाणे, निरस वाटतो, तसे आम्ही पहिले नव्हतोच मुळी
ज्या भयाण परिस्थितून गेलो आम्ही, त्यामुळेच आली आमच्यावर हि पाळी

मेहनतीवर ठेवला विश्वास, नाही झालो कधी कुणापुढे लाचार
अभिमानाने सांगू शकशील जगाला, माझे आई बाप आहेत इमानदार…!

                                                          -- अतुल पारखे